प्रतिबिंब....।
प्रतिबिंब
माझा आजचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला. शाळेत जाण्याच्या घाईने मी घरून निघालो. सगळीकडे शांत वातावरण होते. आणि मी रस्त्याने मोटारसायकलने जात होतो. आणि मी सवयीप्रमाणे कुणी लिफ्टसाठी हात केला तर गाडी थांबवतो. व वडनेरजवळील रस्त्यावर गाडी थांबवली. मध्यमवयीन मनुष्य, कपडे चांगले, बोलका चेहरा, उंचपुरा काहीशी धिप्पाड देहयष्टी असलेला इसम.
हात उंचावत म्हणाला, "अहो साहेब" हाताने इशारा केला मालेगावच्या दिशेने. मी बसण्याचा इशारा केला. आणि तो बसला. तसा साधा भोळा वाटला. माझी जन्मकुंडली काढावी तशी विचारपुस त्याने सुरू केली. आपण कुठले? काय करता? नोकरीला कुठे आहात? अशा नानाविविध प्रश्नाचा बडीमार सुरू केला. मला असे वाटले हा इसम सुशिक्षित किंवा चांगल्या कुंटुंबातील असला पाहिजे. मी ही सर्व बाबी प्रामाणिकपणे सांगत होतो. असच बोलता बोलता अजंग मी गाठलं. आणि रस्त्याच्या बाजुला एक कुत्रा दिसला. मला जोरात आवाज देवुन त्या इसमाने "गाडी हळुहळु चालवा, कुत्रास्ना काही भरोसा नही साहेब. कवळ घुसी यितीन, त्यास्ना नेम नही. मी व मना पोऱ्या अशाच मालेगाव जाई रायंतु. कुत्रं आशेच रस्ताकडुन धावत वनं. मोटरसायकलमा घुसनं, आम्ही फेकाई गवुत. पोऱ्या ते बेशुध्द पडी गयता. माले भी मचनस जागे खरचटाई गयतं, कंबर भी ठेसायनं व्हतं. एक महिना पावत दवाखानात काढात.तुम्हीभी बागे गाडी चालावत जा." अशी गोष्टच कथन केली.
मी ही मोटारसायकल कमी वेगात चालवु लागलो. काही अंतर गेल्यावर परत एक कुत्रा दिसला. आणि परत जोरात आवाज देवुन" हळु चाला साहेब, कंबर फार दुखसं." मी तसाच मोटारसायकल चालवत राहिलो. आणि रटाळवाणी बडबड त्याची सुरू झाली . मी भाजीपाल्याचा धंदा करतो व माझे मालेगावला ये जा चालुच असते. माझा भाऊ तलाठी आहे, तुमची शेती आहे का? काही काम असेल तर सांगा. मी तसा कुणाच्याही गाडीवर बसत नाही. पण आज तुमच्या गाडीवर बसलो. मी थोडा विचारात पडल्यात नुसत ऐकत होतो. मालेगावात आम्ही पोहचलो होतो. पण लगेच साहेब म्हणुन आर्त हाक देत तो इसम म्हणाला," साहेब, तुम्ही नोकरीला आहात चहा तरी पाजा." मला शाळेत जाण्याची घाई होत होती. मी हसत दुर्लक्ष केले व मला घाई आहे असे म्हणालो. पण त्या इसमाने रेटाच लावला. साहेब चहा तर पाजावाच लागेल.
मी वैतागलो, "अहो, वडनेर ते मालेगावचे आधी भाडे द्या. मग मी चहा पाजतो." त्या इसमाने नंतर तसे नाही म्हणत. 'नुसतं तोंड गोड करा.' मी दुर्लक्ष करीत होतो. अहो बार मध्ये बसु चला दारू घेऊ.
आता तर माझी सटकली होती मी जोरात आवाज उचलत उद्गारलो," अहो! मला कुठलेही व्यसन नाही आधी उतरा." शेवटी विनविण्या केल्यागत १०रू. तरी द्या म्हणु लागला. मी माझी सोय करून घेतो. निर्लज्जपणे हात पसरवत दहा रूपयांची मागणी करू लागला. मी लगेच मालेगावातील राष्ट्रीय एकात्मता चौक छत्रीजवळ मोटारसायकल थांबवली. तो मोटारसायकल वरून खाली उतरताच मी लगेच वेग वाढवित शाळेच्या दिशेने रवाना झालो. पण नशेच्या अधीन झालेली पहिली व्यक्ती मी पाहीली होती मनातील चांगले प्रतिबिंब तयार झालेली व्यक्ती आता नकोनकोशी झाली होती. व्यसनाधिन व्यक्ती कुठल्याही स्तरांपर्यंत जावु शकते हे पहिले उदाहरण मी अनुभवले. त्या इसमाचे माझ्या मनात तयार झालेले प्रतिबिंब क्षणार्धात पुसले गेले.
-विशाल दा. धिवरे
अंबासनकर/९९२१९३४६३७
Comments
Post a Comment