बालपणाची आठवण
बालपणाची आठवण
आजचा मकर संक्रांतीचा दिवस बालपणीची एक आठवण करुन गेला. लहान मुले गल्लीत रडतांना दिसली व आईजवळ पैसे मागत होती.
आक्का, "माले पतांग घी दे, गण्याले त्यानी आक्कानी पैसा दिधात, तो चिलु वाण्याना दुकानातुन पतांग घी वना,अं...".
आईने काहीनी न बोलता इशाऱ्याने वडीलांच्या कपड्याकडे हात केला आणि हसतच मुलांनी बाबांच्या खिशातुन वीस रूपये घेत आनंदाने उड्या मारत दुकानाकडे धाव घेतली. व रेडिमेट पतंग आणला. पतंगाला दोरी लावत गल्लीत उडवायला लागला. हे सगळे पाहुन जुन्या आठवणींना आवळल्याशिवाय राहवले गेले नाही.
पतंग साठी पैसे मागणे तर दुर, पतंगाचे नाव कधीच घरात काढले नाही. पतंगासाठी घरातील प्रयोगवहीचा कागद, दोरा, घरातील नाराळाच्या झाडुच्या काड्या, डिंक म्हणुन थोर नावाच्या वनस्पतीचा चिक अशा बाबी पाहिजे असत. सकाळपासुन ह्या बाबी शोधण्याचा प्रयत्न सुरू व्हायचा. परिस्थिती गरिबीची असल्यामुळे घरात नारळाचा झाडू असणे दुर्मिळच असायचे. माझे मित्र जुम्मन, बबन मला सोबतीला असायचे. आम्ही सकाळी उकिरडा शोधत फिरायचो तिथे अर्धी सामुग्री जमा व्हायची. नंतर कागदासाठी थोडी कसरत करावी लागायची. सगळ्या वह्या लहान आकारात असायच्या फक्त प्रयोगशाळेच्या वहीचा कागदाचा आकार मोठा असायचा, पण वही फाडली तर घरी मार बसणे निश्चितच व शाळेतही छड्या पडायच्या. मग एक मार्ग शेवटचा असायचा तो म्हणजे जुम्मन. जुम्मनचे वडील भंगार व रद्दीचा व्यवसाय करायचे, मग त्यांच्या घरी रद्दीत जुन्या प्रयोग वह्या येत असत. त्यासाठी त्याच्या वडीलांची नजर चुकवून एखादी वही आणावी लागायची. त्याबदल्यात पहीली पतंग जुम्मनची व्हायची. सगळ्याबाबी जमा झाल्यावर गावाच्या बाहेरील खळवाडी होती. खळवाडी म्हणजे गायी, गुरं बांधायाची व शेतीची अवजारे, कांद्याची चाळ अशा नानाविध बाबी ठेवायची जागा. प्रत्येक खळ्याचे कुंपण थोर या वनस्पतीचे होते. आम्ही नदीजवळील खळ्याकडे बसायचो. लाकडे जमा करायला गेलो अशा कारणामुळे कोणताही खळेमालक खळ्याच्या आसपास फिरकु द्यायचा नाही. निवांत पतंगाची सामुग्री घेवुन नदीकडे जायचो. मग कागदी पतंग तयार करण्यासाठी प्रयोगवहीचा कागद चौकोनी करून , नारळाच्या झाडुच्या दोन काड्या वेगळ्या करायचो, कागदाचा कर्ण पाहुन एक काडी मापात ठेवायची, दुसरा कर्ण एक काडी थोडी लांब लहान धनुष्य तयार होईल अशी व धनुष्य तयार करून कर्णावर ठेवायचा. मग थोर नावाच्या वनस्पतीच्या डिगऱ्या (लांबट आकाराची पाने) तोडून त्याचा पांढरा द्रव (चिक) लावुन चौकोनी चारही बाजु कागदाचे तुकडे करून चिटकवायच्या, मध्ये मोठी लांबट कागदाची पट्टी चिटकवायची. मग त्याला साजेशी एक लांब पट्टी तयार करून शेपुट म्हणुन चिटकवायची. उकिरड्यावरून जमा केलेला दोऱ्याचा गुंता काढुन लांबच लांब दोर तयार करायचा. व पतंगाला दोर लावायचा, पुर्ण पतंग तयार व्हायची अशी पतंगनिर्मिती आमची व्हायची. अशा तीन पतंग तयार करून नदीत पतंग उडवित दिवस पार व्हायचा. जेवणाची तर भ्रांत पडत असे. घरून निरोप येईपर्यंत वेळ तिथेच जायची. उशीरा घरी गेल्यावर मार मिळणारच हे ठरलेलं. घरी जाऊन मार भेटल्यावर आई जेवण द्यायची.
आजचा काळ बदललाय, आजचा प्रसंग बालपणीचा आठवणींना उजाळा देवुन गेला.
विशाल दा. धिवरे अंबासनकर /९९२१९३४६३७
Comments
Post a Comment